17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता

राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता

पुणे : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतक-यांना बसत आहे. अशातच हवामान विभागाने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान राज्याच्या काही भागात वादळी वा-यासह गारपिटीची देखील शक्यता आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने येत्या ४८ तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

या ठिकाणी पावसाची शक्यता
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली याठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे

छ. संभाजीनगरमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह पश्चिम विदर्भात पुन्हा शुक्रवारी वादळी पाऊस झाला. त्यामुळे पिके जमीनदोस्त झाली असून त्यांचे नुकसान वाढले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अंभई येथे वादळी पाऊस, तर रहिमाबाद परिसरात शुक्रवारी पुन्हा गारपीट झाली. टाकळी अंबड (घेवरी) येथे दुपारी शेतात काम करीत असताना वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झाला. सुधाकर धोंडिराम पाचे (वय ६०) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR