पुणे : राज्यात सध्या अनेक ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे. एकीकडे उन्हाचा चटका अस होत आहे, तर दुसरीकडे वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे. त्यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खान्देशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत असताना उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी
अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वा-यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही भागात उन्हाच्या झळा
एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी, काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पुढील २४ तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. अनेक भागात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे.