19.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप; १५ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप; १५ जणांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळत आहे. चांदीपुरामध्ये आतापर्यंत २७ संशयित रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे चार-चार प्रकरणं नोंदवली गेली आहेत. २७ प्रकरणांपैकी २४ गुजरातमधील आहेत, तर ३ प्रकरणं इतर राज्यातून गुजरातमध्ये आली आहेत.

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये संशयास्पद प्रकरणं समोर आली आहेत. अहमदाबाद शहरातही दोन संशयित प्रकरणं नोंदवली गेली आहेत. वाढत्या केसेस लक्षात घेऊन गुजरातचे आरोग्य मंत्री गुरुवारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत. आरोग्यमंत्री अधिका-यांना सूचना देतील. गुजरातमध्ये ८५०० हून अधिक घरं आणि ४७ हजारांहून अधिक लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे.

राज्य सरकारने सर्वांसाठी एक सूचना जारी केली आहे. चांदीपुरा व्हायरस समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. देशातील आरोग्य यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. चांदीपुरा व्हायरसमुळे अरावली, साबरकांठामधील ग्रामीण भागात संसर्गाचे वातावरण आहे. व्हायरसची आतापर्यंत १५ हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी आतापर्यंत आठ मुलांचा मृत्यू झाला आहे.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे
चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदूला सूज येणे यासारखी लक्षणं दिसतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर ४८-७२ तासांच्या आत मरतात. अशा परिस्थितीत हा व्हायरस लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घातक मानला जातो.

चांदीपुरा व्हायरसपासून असा करा बचाव

चांदीपुरा व्हायरसची लागण होऊ नये यासाठी, डास, माश्या आणि कीटकांपासून दूर राहणे सर्वांत महत्त्वाचे आहे. यासाठी मुलांना रात्री आणि सकाळ-संध्याकाळ फुल स्लीव्ह कपडे घालावेत. डास चावण्यापासून वाचण्यासाठी रात्री नेट वापरा. मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR