मुंबई : (प्रतिनिधी) केंद्र सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन अतृप्त आत्मे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी या दोन आत्म्यांची शांती करावी, त्यांचे समाधान करायला हवे,असा टोला ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आज भाजपाला लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केल्याने बरेच वादंग झाले होते. तोच धागा पकडत आज संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. भाजपाला केंद्रात सरकार बनविण्यासाठी पाठिंबा देणारे आंध्रप्रदेशचे चंद्राबाबू नायडू व बिहारचे नितीश कुमार यांना मंत्रिमंडळात त्यांच्या मनासारखे स्थान मिळालेले नाही. महाराष्ट्राच्या प्रचारात भटकती आत्माची गोष्ट खूप चालली होती. पण आता केंद्र सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे अतृप्त आत्मा आहेत.
प्रथम मोदींनी त्यांच्या आत्म्यांचे समाधान करायला हवे. कारण ज्या प्रकारे मंत्रीमंडळात खाते वाटप झाले, त्यामुळे सर्वच आत्मा अतृप्त आहे. तेव्हा जोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या पदावरून खाली खेचणार नाही तसेच महाराष्ट्रात सरकार बनवत नाही तोपर्यंत अतृप्त आत्मे शांत बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे त्यांची मेहेरबानी असेल तोपर्यंत हे सरकार राहिल, असेही राऊत म्हणाले.
ईडी, सीबीआय हीच भाजपाची ताकद
नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांची ताकद ईडी, सीबीआय पोलिस आणि आयकर विभाग या यंत्रणांमध्ये असून तो त्यांचा आत्मा आहे. शरीरातून हे आत्मे काढून टाकले तर यांच्यात काहीच उरत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. लोकसभा निवडणूकीतील पराभवाचे विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणतात मी हरलेलो नाही. पण, फडणवीसांनी ईडी, सीबीआयचे हत्यार बाजूला करून लढायला यावे. आमच्यासमोर एक मिनिट देखील मैदानात ते टीकणार नाहीत. ज्या एजन्सीचा गैरवापर करता आणि आमच्यासोबत लढता, तुमच्यासारखे डरपोक लोक मी राजकीय आयुष्यात बघितलेले नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
शिंदे, अजित पवार गट, अजित पवार गट, मनसे सुपारीबाज पक्ष
मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर शिंदे गट, अजित पवार गट, मनसेमध्ये अस्वस्थता असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांचे ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत. त्यांच्यात कसली अस्वस्थता असणार? भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. सुपारी घेऊन मोठे झालेले हे सुपारीबाज पक्ष आहेत, अशी टिका राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर हल्ले करा व त्यांना कमजोर करा हे काम दिलेले आहे. त्यांनी तुरुंगाच्या धमकीने या सुपा-या स्वीकारल्या आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.