मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याच्या प्रस्तावास ११ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर १४ जुलै रोजी सरकारने शिक्कामोर्तब केले. आता या योजनेबाबत सुधारीत निकष जाहीर केले आहेत. आता सुधारित निकषानुसार ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत. यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
राज्य शासनाने ११ ऑगस्ट रोजी नवीन शासन निर्णय काढून या योजनेसाठी निकष जारी केले. शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या शासन निर्णयामध्ये अंशत: सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज करण्याची प्रक्रिया, सुधारित निकष आणि लाभार्थ्यांची निवड याची माहिती देण्यात आली आहे. सुधारित निकषानुसार या योजनेच्या लाभासाठी ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी ऑफलाईन अर्ज व तद्ननंतर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, प्राधान्य कुटुंब नसलेले किंवा पिवळे/केशरी रेशनकार्डधारक नागरिक यांना असणार आहे.
प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित पारदर्शक पध्दतीने लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल, असे सांगण्यात आले.