नवी दिल्ली : संपूर्ण जग ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवात मग्न असताना, देवभूमी उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक चारधाम यात्रा सुरू होणार आहे. साधारणपणे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा उन्हाळ्यात सुरू होते, परंतु पहिल्यांदाच हिवाळ्यात यात्रा सुरू होत आहे. जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यात्रेची सुरुवात करतील. शंकराचार्यांच्या प्रतिनिधींनी रविवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. सीएम धामी यांनी चारधाम यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यात्रेला २७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर २ जानेवारीला हरिद्वारमध्ये त्याची सांगता होणार आहे.
यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी ज्योतिर्मठ येथील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री धामी यांची भेट घेऊन यात्रेचे निमंत्रण पत्र दिले. अडीच हजार वर्षांपूर्वी आदिगुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या परंपरेचे पालन करून ज्योतिषपीठाचे शंकराचार्य हिवाळ्यातील धार्मिक स्थळांची यात्रा काढत आहेत.
आदिगुरु शंकराचार्य परंपरेच्या इतिहासात प्रथमच ज्योतिषपीठाचे आचार्य उत्तराखंडमधील चार धाम या धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा करत आहेत. शंकराचार्यांची भेट ऐतिहासिक असल्याचे वर्णन करताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, त्यांच्या यात्रेमुळे चार धामांच्या हिवाळी प्रवासाला प्रोत्साहन मिळेल. या यात्रेचा समारोप २ जानेवारीला हरिद्वार येथे होणार आहे.