रोम : इटलीच्या डेटा प्रोटेक्शन अथॉरिटीने ओपन एआय कंपनीला नोटीस जारी केली आहे. या कंपनीने बनवलेला चॅटजीपीटी हा चॅटबॉट चुकीच्या पद्धतीने यूजर्सचा डेटा गोळा करत आहे. यामुळे देशाच्या गोपनीयता कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
इटलीची डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी दि गारांटे नावाने ओळखली जाते. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून ही संस्था ओपन एआयवर लक्ष ठेऊन आहे. युरोपियन युनियनने निश्चित केलेल्या डेटा प्रायव्हसी नियमांनुसार चॅटजीपीटी काम करत आहे की नाही याकडे या संस्थेचे लक्ष आहे. २०२३ च्या मार्च महिन्यात दि गारांटेने असा आरोप केला होता की ओपन एआयचा चॅटजीपीटी हा चॅटबॉट बेकायदेशीर पद्धतीने यूजर्सचा खासगी डेटा गोळा करत आहे. यासोबतच त्यांनी ओपन एआयला अशी वॉर्निंग दिली होती, की त्यांनी इटलीच्या नागरिकांचा डेटा गोळा करणे तातडीने थांबवावे. यावेळी काही काळासाठी इटलीमध्ये ओपन एआयवर बंदी घालण्यात आली होती.
ओपन एआयने केले बदल
यानंतर ओपन एआयने आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये काही बदल केल्याचे सांगितले होते. इटालियन रेग्युलेटर्सनी सांगितल्याप्रमाणे आपल्या डेटा कलेक्शन पॉलिसीमध्ये बदल केल्याचे ओपन एआयने स्पष्ट केले. यानुसार, त्यांनी युरोपियन युनियनमध्ये येणा-या यूजर्सना आपला डेटा डिलीट करण्याचा ऑप्शन उपलब्ध करुन दिला होता. तसेच, नव्या यूजर्सचे वय तपासण्यासाठीही एक टूल कंपनीने तयार केले होते. आपण यूजर्सचा कोणता डेटा घेतो, तो कशासाठी घेतो, कसा घेतो आणि तो डिलीट कसा करायचा यासाठी ओपन एआयने एक हेल्प आर्टिकल देखील प्रसिद्ध केले होते.
पुन्हा पाठवली नोटीस
यानंतर एप्रिल महिन्यात ओपन एआयला इटलीमध्ये पुन्हा परवानगी मिळाली होती. मात्र आता पुन्हा असे समोर आले आहे, की ओपन एआयने एक किंवा त्याहून अधिक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आता रेग्युलेटरी बॉडीने ओपन एआय आणि मायक्रोसॉफ्टला नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
किती होणार दंड?
युरोपियन युनियनचे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन हे २०१८ साली लागू झाले होते. यानुसार एखाद्या कंपनीने जर दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले, तर कंपनीच्या ग्लोबल टर्नओव्हरपेक्षा चार पट अधिक किंमत दंड म्हणून भरावी लागू शकते. आता ओपन एआयवर ही कारवाई होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.