23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात मिळतेय स्वस्त डिझेल!

महाराष्ट्रात मिळतेय स्वस्त डिझेल!

कोल्हापूर : कमी दर असलेले कर्नाटकातील डिझेल महाराष्ट्रातील सीमाभागात विक्रीच्या गोरखधंद्याने जोर धरला आहे. अधिकृत टँंकरशी मिळतीजुळती असलेली रंगसंगती करून बेकायदेशीर छोट्या टँकरमधून जिल्ह्याच्या विविध हद्दीत दररोज ३० हजार लिटरच्या आसपास डिझेल विकले जात आहे. यातून शासनाचा महसूल बुडत असून महाराष्ट्रातील अनेक पंपांना फटका बसत आहे.

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात जवळपास साडेचार रुपयांनी डिझेल स्वस्त आहे. पेट्रोलही स्वस्त आहे, पण डिझेलची विक्री बल्कमध्ये होत असल्याने त्यातून फायदा कमावणारे काहीजण तयार झाले आहेत. त्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले, शिरोळ या पाच तालुक्यांना कर्नाटकची सीमा लागते.

सहा हजार लिटर क्षमतेचे बाऊझर अनेक पंपधारक मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करणा-या ग्राहकांसाठी वापरतात. त्याच धर्तीवर बाऊझर बनवले असून, त्यांची रंगसंगती अधिकृत टँकरशी मिळतीजुळती केली आहे. त्यामुळे सहज कुणालाही टँकरचा फरक समजत नाही. अशा बाऊझरमध्ये कर्नाटकातील सीमाभागातील पंपांवरून डिझेल घ्यायचे. जिल्ह्याच्या हद्दीतील पाच तालुक्यांत येण्यासाठी अनेक आडमार्ग आहेत. त्या आडमार्गाने रात्रीत येऊन कोणत्या तरी आडमार्गावर ते संबंधितांकडे रिकामे करायचे, असा प्रकार सुरू आहे.

एका टँकरची क्षमता सहा हजार लिटरची आहे. यानुसार ३० हजार लिटरच्या आसपास डिझेल विविध
ठिकाणी विकले जात आहे. त्यासाठी दररोज चार ते पाच बाऊझर (टँकर) काम करत असल्याचे समजते. त्यांचे ग्राहक शक्यतो ट्रक, बस तसेच जिथे डिझेल दररोज लागते, असे मोठे कारखाने आहेत. दररोज बल्कमध्ये डिझेल लागत असल्याने प्रत्येक लिटरमागे दोन-अडीच रुपयांची बचत झाली तरी त्यांचा फायदा आहे. तसेच विकणा-यांनाही दोन रुपये मिळतात. यातून दोन्ही बाजूचा फायदा होत असल्याने कुणी काहीच बोलत नाही.

उपाययोजना करावी
या प्रकाराबाबत असोसिएशनने जिल्हाधिका-यांना कळवले आहे. त्यांच्याकडून आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासणी केल्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला, पण प्रकार सुरू आहे. यातून शासनाचा महसूल बुडत आहे, त्यांनीच उपाययोजना करायला हवी असे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी म्हटले आहे.

सीमेवर १०० वर पंप
जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांची संख्या ३०० वर आहे. त्यातील कर्नाटकाच्या सीमेवर १०० च्या आसपास पंप आहेत. महाराष्ट्रापेक्षा कमी दर असल्याने अनेक वाहनधारक कर्नाटकात जाऊन डिझेल, पेट्रोल भरतात. मोठ्या प्रमाणावर डिझेल लागणा-या ग्राहकांवर पंपचालक अवलंबून होते. आता त्यातील बहुतांशजणांकडे असा पुरवठा होत असल्याने पंपांना मोठा फटका बसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR