पुणे : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर प्रक्रियेला एका अर्थाने सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीमधून बाहेर पडून आगामी निवडणुकीसाठी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नजीकच्या काळात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्यामुळे राजकीय पक्षातील विद्यमान आमदारांच्या बरोबरीने इच्छुक मंडळींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री पाटील यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर तासभर चर्चा केली. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा घेऊन चर्चा केली आणि पक्ष प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुळे यांनी सांगितले की, पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे जी मंडळी नाराज आहेत त्यांची समजूत काढण्यात येईल तसेच ते पुन्हा पक्षात येत आहेत याचा आनंद आहे. सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात पाटील आणि भरणे यांच्यात लढत होणे शक्य आहे.
त्याचप्रमाणे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबरीने अमोल बालवडकर तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म आमदार असणा-या माधुरी मिसळ यांच्याबरोबर महानगरपालिकेतील गटनेते श्रीनाथ भीमाले, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले, कसबा मतदारसंघात टिळक आणि माजी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक हेमंत रासने आदींनी तयारी सुरू केली आहे. हीच परिस्थिती शहर आणि जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील आहे. यंदा प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुक मंडळीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसते आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या समोर कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता तयार झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत वाढणार चुरस
मतदारसंघांची मर्यादित संख्या, त्यातच एकूणच बदलते राजकीय वारे उमेदवारी मिळण्यासाठीचे दोन पर्याय म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती आणि मध्यंतरीच्या काळात नव्याने तयार झालेली तिसरी आघाडी होय. त्यामुळे पर्याय असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात राजकीय वारे कसे राहील यावर बरेचसे अवलंबून असणार आहे.