यवतमाळ : पशु-पक्ष्यांची झुंज लावण्यास कायद्याने बंदी असली तरी अनेक गावांत या स्पर्धा बिनधास्तपणे भरवल्या जातात. असाच एका कोंबड्यांच्या रक्तरंजित झुंजीचा व्हीडीओ यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील इंझाळा येथून समोर आला आहे. अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या झुंजीसाठी जिल्ह्यासह विविध राज्यांतील हौशी नागरिक याठिकाणी दाखल झाले असल्याचे बघायला मिळाले. मात्र बंदी असूनही अशा झुंजी खुलेआम सुरू असल्याने पोलिसांवर शंका उपस्थित केली जात आहे.
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील इंझाळा बेडा गावात अवैध पद्धतीने कोंबड्यांची झुंज लावण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यासह चंद्रपूर, वणी, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, घोन्सा आणि लगतच्या तेलंगणा राज्यातील नागरिक इंझाळा बेडा गावात दाखल होत असतात. आठवड्यातील रविवार, शुक्रवार आणि बुधवारी या झुंजी लावल्या जातात.
ज्यामध्ये अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या कोंबड्यांच्या झुंजीवर लाखो रुपयांची उलाढाल होते. पोलिसांच्या आशीर्वादाने घाटंजी येथील मटका व्यावसायिक ही कोंबड्याची झुंज भरवत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. ही झुंज बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करत असतात. असाच एक कोंबड्यांच्या झुंजींचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिस या प्रकरणात काय कारवाई करतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.