नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे आज विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. यानंतर विधानसभा सभागृह कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. उद्या सभागृहाचे कामकाज नियमितपणे होणार असून, यावेळी हा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला जाणार असल्याचे देखील केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार पुन्हा एकदा विधानसभेत आपले बहुमत दाखवणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांनी शुक्रवारी सभागृहात विश्वासदर्शक ठराव घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान केजरीवाल यांनी विधानसभेत बोलताना पुन्हा एकदा भाजपवर विधानसभेत ‘ऑपरेशन लोटस’ चालवल्याचा आरोप केला. तसेच आपल्या पक्षाचे सात आमदार विकत घेण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आमच्या पक्षाचा एकाही आमदाराने पक्षांतर केले नाही हे जनतेला दाखवायचे आहे, म्हणूनच हा विश्वासदर्शक ठराव मांडत असल्याचेही केजरीवाल म्हणाले.
आज दिल्ली विधानसभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आम्ही पाहू शकतो की पक्ष फोडले जात आहेत आणि खोटे खटले टाकून इतर राज्यांत सरकार पाडले जात आहे. दिल्लीत, दारू धोरण प्रकरणाच्या बहाण्याने ‘आप’च्या नेत्यांना अटक करण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यांना सरकार पाडायचे आहे. दिल्ली सरकारला माहित आहे की, ते दिल्लीत कधीही निवडणूक जिंकू शकत नाहीत. आमचा एकही आमदार तुटलेला नाही आणि ते सर्व अबाधित आहेत हे लोकांना दाखवण्यासाठी मी विश्वासदर्शक ठराव मांडत असल्याचे आप प्रवर्तक आणि दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.