24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा राज्यात प्रारंभ

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा राज्यात प्रारंभ

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

या अभियानात राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा सहभागी असतील. मुंबई महापालिका, वर्ग-अ आणि वर्ग-ब महानगरपालिका शाळा, उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येईल.

क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. हे अभियान ४५ दिवस राबविले जाईल. या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी एकूण १०० गुण असतील.

मुंबई महापालिका क्षेत्रातील तसेच अ व ब वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले पारितोषिक २१ लाख, दुसरे पारितोषिक ११ लाख, तिसरे पारितोषिक सात लाख मिळेल, तर उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांनादेखील तालुका, जिल्हा तसेच विभागनिहाय पारितोषिके मिळतील. राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखांचे असून दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाखांचे असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR