परभणी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काही मर्यादित काळासाठीची योजना नसून ती निरंतर चालणार आहे. या योजनेत किमान अडीच कोटी महिला आपला सहभाग नोंदवतील. आतापर्यंत १ कोटी ४५ लाख महिलांनी या योजनेत आपला सहभाग नोंंदवला आहे. या योजनेला महिलांमधून मोठा प्रतिसाद मिळत असल्यानेच विरोधक गैरसमज पसरवत आहेत असा आरोप महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी महिला व बालविकास मंत्री श्रीमती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांचा संवाद मेळावा रविवार, दि. ११ परभणी येथे पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या मेळाव्याला युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आ. डॉ.रत्नाकर गुट्टे, आ.मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, भाजपा विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, राकाँ महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, माजी महापौर प्रताप देशमुख, नंदाताई राठोड, दशरथ सुर्यवंशी, चंद्रकांत राठोड, कृष्णा तळेकर, किरण तळेकर आदींंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, महायुती सरकार राज्यातील महिलांचा सन्मान करत असून या योजनेंतर्गत दरमहा १५०० रूपये महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर डिबीटीद्वारे वर्ग केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत महिलांना स्वावलंबी बनविण्याचा महायुती सरकारचा उद्देश आहे. राखी पोर्णिमेच्या दोन दिवस आधीच योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर टाकण्यात येणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. या मेळाव्याला अंगणवाडी सेविका, अंगणवाडीताई, समुदाय संसाधन व्यक्ती आदींसहीत महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.