26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रदेवाची नव्हे, नव-याची कृपा म्हणून मुलं होतात

देवाची नव्हे, नव-याची कृपा म्हणून मुलं होतात

‘जन सन्मान’ यात्रेत अजित पवारांचे विधान

मावळ : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र फिरत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे.

अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा मावळ येथे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य केले. यावेळी, हात जोडून सांगायचंय की, मुलं होतात देवाची कृपा, अल्लाहची कृपा म्हणतात. पण काही देवाची वगैरे कृपा नसते. नव-याची कृपा असते म्हणून पोरंबाळं होतात. कृपा करून दोन मुलांवर थांबा. दोन मुलांवर थांबलात तर अधिक योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना शिकवता येईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मावळमध्ये मागासवर्गीय समाज आहे. लहान कुटुंब ठेवलं तर या योजनांचा अधिक फायदा तुम्ही घेऊ शकता. त्या दोन मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकाल. चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकता. तसेच, तुम्ही देखील चांगले जीवन जगू शकता. आम्ही बाकीच्या बाबतीत ८० कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य देतो. जनसन्मान योजनेच्या माध्यमातून याच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. त्यामुळे विरोधक जे सांगत आहेत पैसे परत घेणार आहेत. तर असे काहीही होणार नाही. पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी उद्या पैसे जमा होणार आहेत. ते पैसे तुमचे आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. महिलांनी आशीर्वाद दिले. महायुतीमधील जिथे जिथे उमेदवार असतील त्यांना मतदान करा. म्हणजे ही योजना कायमची सुरू ठेवता येईल, असे आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केले आहे.

मला गुलाबी रंग आवडतो
गुलाबी रंग महिलांना आवडतो म्हणून मलाही आवडायला लागला. यात चुकीचे काय आहे. आम्ही वेडेवाकडे तर करत नाही ना? महिला लग्नात देखील इतक्या सुंदर दिसत नव्हत्या. इतक्या फेट्यात दिसत आहेत. नवरे देखील ओळखायचे नाहीत. फेटा घरी जाईपर्यंत काढू नका, फेटा घातल्यावर कोण कसा दिसतो, हे नव-याला विचारा असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR