बिजींग : तीन वर्षांपूर्वी जगभरात हाहाकार माजवणा-या कोरोनाचा कहर लोक अजूनही विसरले नाहीत. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढत असतानाच, चीनमधून एक गंभीर बातमी समोर आली आहे. कोविडइतक्याच घातक अशा व्हायरसवर सध्या चीनमध्ये प्रयोग सुरू आहे. बायोरेक्टिव्ह वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरमध्ये ही माहिती समोर आली.
चिनी सैन्यातील डॉक्टरांनी पँगोलिन कोरोना व्हायरस नावाचा एक कोविडचा व्हेरियंट तयार केला असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. डॉक्टरांची टीम ही या विषाणूचा प्रयोग उंदरांवर करत आहे.
उंदरांवर भीषण परिणाम
या डॉक्टरांनी काही उंदरांना या विषाणूचा डोस दिला. त्यानंतर त्यांना काही हेल्दी उंदरांसोबत एकाच पिंज-यात ठेवलं. 7-8 दिवसांमध्येच निरोगी उंदरांनाही या नव्या विषाणूची लागण झाल्याचं डॉक्टरांना दिसून आलं. यानंतर पाचच दिवसांमध्ये सर्व उंदरांचं वजन अतिशय कमी झालं.. आणि अखेर डोळे पांढरे पडून त्यांचा मृत्यू झाला.
कोरोना विषाणू हा सर्वात आधी चीनच्या वुहान शहरामध्ये आढळला होता. चीनमध्येच याची निर्मिती झाली असावी असा आरोप जगभरातील कित्येक देशांनी आतापर्यंत केला आहे. अर्थात, याबाबत अद्याप ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. मात्र, जगभरातील कित्येक नागरिकांचा चीनवरील संशय अजूनही कायम आहे.