नवी दिल्ली : भारतीयांची खासगी माहिती चोरणा-या कित्येक चिनी अॅप्सवर आतापर्यंत सरकारने कारवाई केली आहे. यामध्ये बाईट डान्स कंपनीच्या टिकटॉक अॅपचे नाव प्रामुख्याने समोर येते. मात्र, सरकारच्या कारवाईनंतर देखील कित्येक चिनी अॅप्स हे अजूनही लोकांची खासगी माहिती चोरत असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, हे अॅप्स लहान मुलांचे गेमिंग अॅप्स आहेत. आपली मुले शांत बसावीत म्हणून कित्येक पालक त्यांना मोबाईलवर गेम्स लावून देतात. मात्र, काही चिनी गेमिंग अॅप्स या मोबाईलमधील डेटा चोरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रायव्हसी रिसर्च फर्मने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील ११ डेटा हंग्री अॅप्सपैकी तीन ऍप्स या लहान मुलांच्या गेम्स आहेत. हे तिन्ही ऍप्स बेबीबस कंपनीचे आहेत.
१. बेबी पांडा वर्ल्ड
(एक कोटींहून अधिक डाऊनलोड)
२. बेबीबस किडस् (१०मिलियन डाऊनलोड)
बेबी पांडास् किड्स प्ले
(१० मिलियन डाऊनलोड)
२०२३ च्या तिस-या क्वार्टरमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आशियामध्ये डाऊनलोड झालेल्या एकूण लहान मुलांच्या गेम्समध्ये बेबीबस कंपनीच्या अॅप्सचा वाटा तब्बल ६० टक्के होता. यावरूनच लक्षात येते की कोट्यवधी लोकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स आहेत.
‘इकॉनॉमिक टाइम्स’ने या अॅप्सची तपासणी केल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. हे अॅप्स मोबाईलची इन्फर्मेशन, आयडी, अॅप इन्फर्मेशन, परफॉर्मन्स, फायनॅन्शिअल इन्फर्मेशन, पर्चेस हिस्ट्री, ईमेल आयडी, यूजर आयडी आणि इतर सेन्सिटिव्ह माहिती गोळा करत असल्याचे यात स्पष्ट झाले.