14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeराष्ट्रीयब्रम्हपुत्रावर चीन बांधणार सर्वांत मोठे धरण?

ब्रम्हपुत्रावर चीन बांधणार सर्वांत मोठे धरण?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-चीन संबंधांमध्ये सातत्याने चढउतार राहिला आहे. कुरापतखोर राहिलेले चीन एक पाऊल मागे घेतल्यानंतर पुन्हा विश्वासघात कधी करेल, याचा अंदाज येत नाही आणि आजवर आलेलाही नाही. ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान शहरात पीएम मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी बैठक झाली. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांत परिस्थितीत फरक पडेल, अशी चर्चा होती.

मात्र, चीनने पुन्हा एकदा या सर्व प्रयत्नांना कात्रजचा घाट दाखवला आहे. आता लडाखमध्ये दोन काउंटी (परगणा) निर्माण करून चीन ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या तयारीत आहे.
मुळात एक पाऊल मागे आणि दोन पावले पुढे जाणे हा चीनच्या विस्तारवादी धोरणाचा भाग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चीनने नुकतेच होटन प्रांतात दोन नवीन काऊंटी निर्माण करणार असल्याची घोषणा केली होती. त्याचा काही भाग लडाखमध्ये आहे. चीनच्या या पावलावर भारताने टीका करत हे पाऊल स्वीकारता येणार नाही, असे म्हटले आहे. हा भाग भारताचा आहे आणि चीनचा येथे दावा पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

चीन तिबेटजवळ ब्रम्हपुत्रा नदीवर भारतीय सीमेजवळ धरण बांधण्याच्या तयारीत आहे. २५ डिसेंबर रोजी चीनने याला मान्यता दिली आहे. जगातील सर्वात मोठे धरण म्हणून वर्णन यांची गणना केली जात आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे १४० अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. चीनच्या या तयारीला भारताने विरोध केला आहे. यानंतर चीनने खुलासा केला असला तरी तो तोकडा आहे. ब्रम्हपुत्रेवरून भारत आणि चीनमध्ये वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. ब्रम्हपुत्रेवरून जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील जलयुद्धाला कारणीभूत ठरत चालली आहे. त्यामुळे भविष्यात या कारणावरून वाद उफाळून येऊ शकतो.

ब्रम्हपुत्रा नदी भारत, चीन आणि बांगलादेशसाठी वरदान आहे. ही नदी सिंचन आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण हिमालयीन प्रदेशात बर्फ वितळला की पूर येतो. अनेक उपनद्या त्यात सामील होतात. ब्रम्हपुत्रा नदी जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीनमधून जाते आणि बांगलादेशला मिळते. त्याची तुलना जगाच्या एकूण लोकसंख्येशी केली तर असे म्हणता येईल की ही २९०० किमी लांबीची नदी जगातील ३७ टक्के लोकसंख्येला प्रभावित करते. त्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

ब्रम्हपुत्रा जगातील नववी सर्वांत मोठी नदी
ब्रम्हपुत्रा नदी तिबेटमधील कैलास पर्वताजवळील मानसरोवरातून उगम पावते आणि भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून बांगलादेशात जात बंगालच्या उपसागराला मिळते. आसाममध्ये ती ब्रम्हपुत्रा किंवा लुईत म्हणून ओळखली जाते. तिबेटमध्ये तिला यारलुंग त्सांगपो म्हणून ओळखली जाते. अरुणाचलमध्ये ती सियांग/दिहांग नदी म्हणून ओळखली जाते आणि बंगालीमध्ये ती जमुना नदी म्हणून ओळखली जाते. प्रवाहाच्या बाबतीत ही जगातील नववी सर्वात मोठी नदी आहे आणि १५ वी सर्वात लांब नदी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR