मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अद्यापही अटक करण्यात न आल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ २८ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे या घटनेच्या तपासाला वेग आला असून, राज्य सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झाले. त्यांच्यासह सीआयडी पुणे विभागाचे विभागीय उपमहानिरीक्षक बसवराज तेली, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवंत हे दिवसभर केजमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे अद्याप मोकाट असलेल्या आणखी तीन आरोपींना अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज १८ दिवस पूर्ण झाले. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. १२ दिवसांपूर्वी हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. बीडचे एसपी नवनीत कॉवंत यांच्यासोबत पोलिस अधीक्षक कार्यालयात सीआयडीच्या विशेष पोलिस महासंचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्याकडे संशयाची सुई असल्याने त्यांना या प्रकरणात अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी जयराम चाटे, महेश केदार या दोघांना आधीच अटक झाली आहे. तसेच प्रतिक घुले याला पुणे जिल्ह्यातून अटक केली. तसेच अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यालाही अटक झाली आहे.
आणखी तीन आरोपी फरार
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अद्याप फरार आहेत. तसेच या घटनेचा मास्टरमाईंड म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव चर्चेत आहे. ज्या खंडणी प्रकरणाचा संबंध या हत्याकांडाशी जोडला जात आहे, त्यामध्ये वाल्मिक कराड याचे नाव आहे.
हवेत गोळीबार करणारा मुंडेंचा कार्यकर्ता अटकेत
हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणा-या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी पोलिसांनी आज त्याला अटक केली. कैलास फड असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. त्यावरून गुन्हा दाखल केला होता. आज त्याला परळीत अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्याजवळील पिस्तूल ताब्यात घेण्यात आले.
दमानियांनी मुंडेंच्या हातातील पिस्तुलाचा फोटो केला शेअर
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली असून, आज त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचाही पिस्तुल हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक तरुणांचे हातात रिव्हॉल्व्हर घेतलेले फोटो शेअर केले आहेत. यावरून बीडमध्ये पिस्तुलच्या धाकाने कशी गुन्हेगारी वाढली, हे त्यांनी दाखवून दिले.
शस्त्रास्त्र परवान्यांची चौकशी करा
बीडसारख्या एका जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्र परवाने वाटल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात केला होता. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, गुंडांचा नाही, असे सांगत राज्यातील सर्व शस्त्रास्त्र परवान्याची चौकशी लावावी आणि गरज नसलेल्यांचे परवाने तातडीने रद्द करावेत, असे म्हटले आहे.
अंबाजोगाईत तरुणावर कोयता, चाकूने वार
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिस प्रशासनाची तक्तरे वेशीवर मांडली जात असतानाच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची आणखी एक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाजवळील पोलिस चौकीच्या समोरच एका तरुणावर चौघांनी चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.