मुंबई : प्रतिनिधी
मुंबई तसेच उपनगरात आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. त्यासाठी म्हाडा तसेच सिडको यांच्यातर्फे मुंबई आणि उपनगरांत घरांची बांधणी करून त्यांची कमी किमतीत विक्री केली जाते. सामान्यांना परवडतील, अशी घरे बांधून ती विकली जातात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. मात्र ही घरे महाग आहेत, अशी तक्रार सामान्यांकडून केली जात होती. त्यावर आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी आगामी काळात सिडकोची घरे स्वत होणार असल्याचे संकेत दिले.
शिरसाट सध्या सिडकोचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सिडकोची महागडी घरे आणि त्याबाबत लोकांची तक्रार याविषयी त्यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना त्यांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यात येतील, असे संकेत दिले. तसेच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये, यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथील करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रहिवासी प्रमाणपत्राची अट काढून टाकणार?
सिडकोच्या घरांच्या विक्री प्रक्रियेतही बरेच महत्त्वाचे बदल करण्याचे त्यांनी संकेत दिले. एका कुटुंबात याआधी सिडकोचे घर असले तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरे घर घेता यावे, यासाठी अटीत बदल केले जातील, असे शिरसाट यांनी सांगितले. म्हणजेच हा बदल प्रत्यक्षात आला तर एकाच घरात सिडकोची एकापेक्षा अधिक घरे विकत घेता येतील. तसेच रहिवासी प्रमाणपत्राची अटही काढून टाकण्यावर विचार केला जाईल, असे शिरसाट म्हणाले.
…तर परप्रांतीयांना फायदा
आजही मुंबईत मराठी माणसाला घरे मिळत नाहीत. अशा अनेक गुजराती वा इतर भाषिकांच्या सोसायट्या आहेत, ज्या ठिकाणी मराठी माणसाला घरे नाकारली जातात. असे अनेक परप्रांतीय आहेत की ज्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यातल्या शासकीय संस्थांमध्येही घरे घेतल्याचे बोलले जात आहे. त्यात सिडकोने महाराष्ट्राच्या रहिवासी प्रमाणपत्राची अट काढून टाकली तर परप्रांतियांना मोकळे रान मिळण्याची शक्यता आहे.