पालम : पालम हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणाहून जाणा-या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. परंतू रस्त्यावरच बेशिस्त उभा केलेल्या वाहनामुळे छोटे मोठे अपघात होवून वाद विवादाच्या घटना घडत आहेत. या प्रकाराकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांत होत आहे.
शहरातून ३६१ हा महामार्ग जातो. या ठिकाणावरून दररोज मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर यासारख्या अनेक शहरात वाहने जातात. परंतु मागील काही दिवसांपासून रस्त्यावरच्या कडेला उभ्या राहणा-या बेशिस्त वाहनामुळे अपघातासह वादविवादाचे घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकतीच एका वाहनाची मोटर सायकलला धडक लागल्याने याच रस्त्यावर दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती.
नव्याने आलेले पोलीस निरीक्षक यांचे या प्रकाराकडे लक्ष नसल्याने दिवसेंदिवस बेशिस्त वाहन पार्कींग करणा-यांचे मनोबल उंचावत आहे. याच प्रकारामुळे नागरीकही त्रस्त झाले आहेत. यामुळे बेशिस्त वाहनधारकावर संबंधित अधिका-यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.