अमरावती : येथे सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली असून या भीषण दुर्घटनेत एका नऊ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर ही दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतर जमावाकडून बसची तोडफोड करण्यात आली.
प्रीतम गोविंद निर्मळे या ९ वर्षांच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळावर मृत्यू झाला. तर ६० वर्षीय नर्मदा निर्मळे आणि १४ वर्षीय वैष्णवी संजय निर्मळे, नेहा संतोष निर्मळे या तिघांचीही प्रकृती आत्यावस्थ असल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अमरावती सायन्स कोर परिसरातील मध्यवर्ती बस स्थानकाकडून येणा-या सिटी बसचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या सिटी बसणे चौघांना चिरडले. या घटनेत एका चिमुकल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा चिमुकला बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेच्या सिटी बसचे ब्रेक अचानक फेल झाले. ही बस तेव्हा अमरावती शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाकडून जात होती. अचानक ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रित झाली आणि या सिटी बसने रस्त्यावरून जात असणा-या चार जणांना जबर धडक दिली. या धडकेत प्रीतम गोविंद निर्मळे या चिमुकलीचा घटनास्थळी मृत्यू झाला.
यावेळी संतप्त झालेल्या जमावाने बसवर एकच हल्ला चढवला. या हल्ल्यात बसच्या काचा फोडण्यात आल्या. संतप्त जमावाने बसवर हल्ला केला. नागरिकांच्या संतप्त भावना बघून पोलीस आयुक्तालयातील क्विकरिस्पॉन्स टीमसह पोलिस ठाण्यातील अनेक कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलिसांनी जमावाला शांत करून क्रेन साहाय्याने बसला घटनास्थळावरून हलवली. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सायन्स कोर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने निर्मळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.