21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात थंडीचा कडाका कायम

राज्यात थंडीचा कडाका कायम

विदर्भ, मराठवाड्यात किमान तापमानात घट

नागपूर : महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट या महिन्याच्या अखेरपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातच किमान तापमानाचा पारा कमी होणार आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या उपराजधानीत किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. मागील आठवड्यात विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. तर या आठवड्यात देखील किमान तापमान असेच राहील असा अंदाज आहे. मराठवाड्यात देखील थंडीचा कडाका कायम आहे.

एक फेब्रुवारीनंतर परिस्थिती हळूहळू बदलेल. मात्र, त्याआधी राज्यातील नागरिकांची थंडीपासून सुटका नाही. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी राहील असा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्याची उपराजधानीच गारठली होती. मात्र, आता राज्याच्या राजधानीत सुद्धा थंडीचा कडाका जाणवत आहे.

किमान तापमानासह कमाल तापमानात देखील घट होत आहे. एरवी उकाडा जाणवणा-या राजधानीत आता धुकेसुद्धा पाहायला मिळत आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या सुरुवातीला किमान तापमानात हळूहळू वाढ होताना दिसून येईल. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसांत काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता सुद्धा भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR