नागपूर : नागपूरमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बाजारगाव येथील एका कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती असून जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.
नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे.
सोलार कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारूगोळा सप्लाय करते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करत असल्याची माहिती आहे.
‘एक्सप्लोझिव्ह’मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे. दरम्यान, स्फोटामध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली.
मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे.