22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरप्राणिसंग्रहालयाच्या त्रुटींची पूर्तता; केंद्रीय समितीस पाठविला प्रस्ताव

प्राणिसंग्रहालयाच्या त्रुटींची पूर्तता; केंद्रीय समितीस पाठविला प्रस्ताव

सोलापूर : केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने काढलेल्या ४५ त्रुटींमुळे विजापूर रोडवरील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय मागील चार वर्षापासून बंदच आहे, त्यामुळे सामान्य सोलापूरकर व पर्यटकांची निराशा होत होती. अखेर महापालिकेच्या वतीने केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाच्या ४५ पैकी ४५ त्रुटी पूर्ण केल्या आहेत. केंद्रीय समितीस प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच ही समिती प्राणिसंग्रहालयाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. चिडियाघर प्राधिकरणाच्या त्रुटींची पूर्तता झाली तर लवकरच नागरिकांसाठी महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय खुले होणार आहे.विजापुर रोडवरील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. मात्र, केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालय सुरू करण्यासाठी ४५त्रुटी काढल्या आणि त्रुटींची पूर्तता करा; अन्यथा प्राणिसंग्रहालय बंद करा, असे आदेश दिले होते.

त्यामुळे मागील चार वर्षापासून हे प्राणिसंग्रहालय बंद होते. या चार वर्षांत महापालिकेच्या वतीने ४५ पैकी ४५ त्रुटींची पूर्तता केली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाच्या वैभवात भर पडली आहे. दिल्लीच्या केंद्रीय चिडियापर प्राधिकरणास तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच केंद्रीय टीम येणार आहे. दिल्लीच्या टीमने मान्यता दिल्यास लवकरच प्राणिसंग्रहालय सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, फेब्रुवारीपासूनच तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे. स्पामुळे प्राण्यांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी प्राणिसंग्रहालयात कुलर बसविण्यात आले आहेत.

त्यांच्यावर वेळोवेळी पाण्याचा फवाराही मारण्यात येत आहे.संग्रहालयाच्या चारी बाजूंनी संरक्षक भिंत बांधली आहे.वृक्षलागवड, प्राण्यांसाठी किचन, दवाखाना उभारण्यात आला आहे. पोस्टमार्टम विभाग उभारला आहे. पाण्याचे फवारे,प्रत्येक पिंजऱ्यात सर्व सोयींनीयुक्त शेड उभारले आहे. रस्ते, वीज, पथदिवे, गवत, सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. प्राण्यांची निगाराखण्यावर भर देण्यात आला आहे.

केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने ज्या ४५ त्रुटी दिल्या होत्या, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. किचन, दवाखाना, पोस्टमार्टम विभाग करण्यात आले आहे. केंद्रीय समितीने पाहणी करून परवानगी दिल्यास लवकरच प्राणिसंग्रहालय पुन्हा नागरिकांसाठी खुले होईल. असे महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाचे कार्यालयीन अधीक्षक ओम वाघमारे म्हणाले.
महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील सर्वच प्राण्यांची चांगल्याप्रकारे निगा राखण्यात येत आहे. सर्वच प्राणी सुदृढ आहेत. त्यांना चांगला आहार देण्यात येत आहे. महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाच्या डॉ. सोनिया ढवळे यांनी सांगीतले.

सध्या उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने बिबट्यांसाठी दोन कुलरची सोय करण्यात आली असून, ते लावण्यात आले आहेत. इतर प्राण्यांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच हिरवे कापडही मारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR