सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी सोलापूरमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या चिंतन बैठकीसाठी निरीक्षक म्हणून खासदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धनंजय महाडिक आले होते. या चिंतन बैठकीतच भाजप पदाधिकाऱ्यांनी महाडिकांना जाब विचारला, त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला.
लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी आज सोलापूरमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बैठकीत गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मोहोळच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तसेच, प्रणिती शिंदे यांच्यासाठी मेळावाही घेतला होता. मोहोळमधून प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे भीमा कारखान्याच्या काही संचालकांनी शिंदेंना दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय झाला होता.
त्या पार्श्वभूमीवर भीमा कारखान्याचे प्रमुख तथा भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखालीच पराभवाची चिंतन बैठक आयोजित केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्या नाराजीचा भडका चिंतन बैठकीत उडाला.भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी आपले म्हणणे सादर केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक बोलायला उभे राहिले, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा मुद्दा मांडला. कारखान्याची काही संचालकांनी प्रणिती शिंदेंना पाठिंबा का दिला, असा सवाल महाडिकांना विचारला. मात्र, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली.
दरम्यान, सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ घातल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आले. गोंधळानंतर भाजपची बंद दाराआड बैठक सुरू आहे.