27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकाश्मिरात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी

काश्मिरात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी

श्रीनगर : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर विधानसभेसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागांवर निवडणूक लढेल. काँग्रेसला ३२ जागा देण्यात आल्या आहेत. तर, दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. एक जागा सीपीआय तर एक जागा जेकेएनपीपी पक्षाला सोडण्यात आली आहे. पाच जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक कर्रा यांनी एका जागेवर सीपआय आणि एका जागेवर जेकेएनपीपी पक्ष निवडणूक लढतील असे म्हटले. फारुक अब्दुल्ला यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की आनंदाची बाब आहे, जे लोकांमध्ये गट पाडण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या विरोधात मोहीम सुरु केली होती. इंडिया आघाडी यासाठीच निर्माण झाली होती. सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली, आम्ही निवडणुकीच्या जागा वाटपाचा समझोता केला असल्याचं फारुक अब्दुल्ला म्हणाले.

के.सी. वेणुगोपाल काय म्हणाले?
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाजपला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? भाजपने यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसोबत युती केलेली आहे. नॅशनल कॉन्फरन्स जुनीच नॅशनल कॉन्फरन्स आहे. तर, पीडीपी देखील जुनीच पीडीपी आहे. भाजपने दोन्ही पक्षांसोबत युती कलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला कार्यक्रम असतो, जाहीरनामा आणि आश्वासने असतात. आमच्याकडे जाहीरनामा आहे. आम्ही जेव्हा सरकार बनवू तेव्हा किमान समान कार्यक्रम असेल असे वेणुगोपाल म्हणाले.

जम्मू-काश्मिरात ३ टप्प्यांत मतदान
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला होणार आहे. दुस-या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबर तर तिस-या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. तर, ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात २४, दुस-या टप्प्यात २६ आणि तिस-या टप्प्यात ४० जागांवर मतदान होईल. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR