24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस महासंचालकांच्या नियुक्ती संदर्भात ‘तात्पुरत्या’ शब्दावर काँग्रेसचा आक्षेप

पोलिस महासंचालकांच्या नियुक्ती संदर्भात ‘तात्पुरत्या’ शब्दावर काँग्रेसचा आक्षेप

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्ती संदर्भात पुन्हा एकदा काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती पोलिस महासंचालकपदी तात्पुरती दाखवली आहे. मात्र निवडणूक आयोगाने तात्पुरती नियुक्ती करा असे आदेश दिलेले नसल्याचे सांगत या नियुक्तीवरून काँग्रेस पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

काँग्रेसच्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या पदावर संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात एवढ्या मोठ्या जबाबदार पदावरती तात्पुरती नियुक्ती करता येत नसल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे. त्यामुळे या नियुक्तीच्या विरोधात काँग्रेस पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

शुक्ला यांच्यावर २०१९ सालच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणात आरोप झालेले असताना निवडणुकीदरम्यान त्यांना पोलिस महासंचालकपदी ठेवू नका, अशी मागणी महाविकास आघाडीने केली होती. ती मागणी मान्य करत आयोगाने शुक्लांना पदमुक्त केले. तसेच, शुक्ला यांची जबाबदारी राज्यातील सर्वांत वरिष्ठ पोलिस अधिका-याकडे द्यावी असे आदेशही आयोगाने दिले. त्यानंतर राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली. पण त्यामध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आल्याने त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला.

शासन निर्णयात काय म्हटले?
संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती ही विधानसभा निवडणूक होईपर्यंत करण्यात येत आहे. रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणूक होईपर्यंत तात्पुरते सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे.

रश्मी शुक्ला सक्तीच्या रजेवर
मतदानाच्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतर हा निर्णय घेण्यात आला. रश्मी शुक्ला या पक्षपाती असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहित झारखंड, पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांना हटवले तर महाराष्ट्रात का कारवाई होत नाही असा सवाल केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR