नवी दिल्ली : उत्तर प्रदेश प्रभारी पदावरून मुक्त केल्यानंतर, आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पदयात्रेमध्ये दिसू शकतात. भारत जोडो यात्रेच्या दुस-या टप्प्याला जानेवारी २०२४ मध्ये सुरुवात होत आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे काढण्यात येणा-या या यात्रेत राहुल आणि प्रियंका गांधी हे दोघेही रस्त्यावर दिसू शकतात. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोठा प्रस्ताव असा आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या यात्रेत सोबत चालावे. या संदर्भात रणनीती आखणा-या मंडळींनी यासंदर्भात विचारही केला आहे.
पहिल्या टप्प्यात सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत, अर्थात जवळपास १५० दिवस राहुल गांधी यांनी पदयात्रा केली होती. यासंदर्भात बोलताना काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याने म्हटले आहे की, या संपूर्ण यात्रेदरम्यान या भाऊ-बहिणीने एकत्रीतपणे सहभागी होण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राहुल गांधी तर नेते आहेतच. मात्र प्रियंका गांधी यांची महिला, तरुण वर्ग आणि ग्रामीण भागांतील लोकांमध्ये चांगली क्रेझ आहे, असे काँग्रेसचे मत आहे. महत्वाचे म्हणजे, दक्षिणेकडून उत्तरेकडे काढण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील पदयात्रेतही, काही ठिकाणी प्रियंका गांधी राहुल गांधींसोबत दिसून आल्या होत्या.
यावेळची यात्रा हायब्रिड मोडमध्ये
नुकतेच काँग्रेस वर्किंग कमिटीने राहुल गांधी यांना यात्रा २.० काढावी असे म्हटले होते. मात्र, लोकसभा निवडणुका लक्षात घेत पुन्हा एकदा ४-५ महिने रस्त्यावर घालवीणे काचित योग्य ठरणार नाही, असेही पक्षाला वाटते. यामुळे काँग्रेस या यात्रेला हायब्रीड यात्रेचे स्वरूपही देऊ शकते. ही यात्रा काही शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये पाई चालेल. तर उर्वरित यात्रा वाहनांतून पूर्ण केली जाईल. सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी असल्यास, माजी काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक कार्यक्रमांसाठी सहजपणे वेळ काढता येईल, हा सर्वात मोठा फायदा असेल.