कोल्हापूर : प्रतिनिधी
महविकास आघाडीचे लोकसभेच्या ३९ जांगावर एकमत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.
शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत. राजकीय पक्षात सामील झालेले त्यांना पाहिलेले नाही, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी शाहू महाराज यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या ३९ जागांवर एकमत झाले आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबते सुरू आहेत. मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. भाजप देशात ४०० पेक्षा जास्त आणि राज्यात ४० पेक्षा जास्त जागा सांगत आहे. मला वाटते हे खूप कमी आकडे सांगत आहेत, असा उपरोधिक टोलाही शरद पवारांनी लगावला.
पुणे येथे शिवछत्रपतींचा पुतळा आहे. तो पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता. कालच्या कार्यक्रमाला मालोजीराजे आणि शाहू महाराज येणार होते. मात्र ते येऊ शकले नाहीत. मात्र, दुस-या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमात येणार होतो. त्यावेळी त्यांची भेट घ्यावी, असे मी म्हणालो. त्यामुळे आज मी त्यांची भेट घेतली, असेही पवार म्हणाले.
शाहू महाराज मैदानात उतरले तर आनंदच
शरद पवार यांनी आज कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीकडे राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासंदर्भात माझ्या एकट्याचा निर्णय असू शकत नाही. यामध्ये काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, शाहू महाराजांना उमेदवारी दिली तर मला आनंद असेल, असे शरद पवार म्हणाले.