29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रघटनाबदलाचे षडयंत्र; ‘मविआ’चे जोरदार आंदोलन

घटनाबदलाचे षडयंत्र; ‘मविआ’चे जोरदार आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत केले आंदोलन विरोधक आक्रमक

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात महाविकास आघाडीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत जे वक्तव्य केले त्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मी शांत आहे वगैरे असा काही प्रश्न नाही. मला पोहचण्यासाठी थोडा उशीर झाला इतकंच कारण आहे असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निष्ठा असणारे लोक हे बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या घटनेमुळे त्यांचे अधिकार टिकवून आहेत. घटनेत बदल करण्यासाठी काही षडयंत्र रचायला सुरुवात झाली तेव्हा देशातल्या जनतेने एक होऊन त्याला तोंड दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट लोक मानतात असे नाही तर संपूर्ण देश मानतो. बाबासाहेब आंबेडकरांबाबत जर असे उद्गार निघाले तर प्रतिक्रिया उमटणारच असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राज्यसभेत अमित शाह यांनी सोमवारी एक वक्तव्य केले होते. आंबेडकरांचे नाव घेणं ही फॅशन झाली आहे. आंबेडकर-आंबेडकर असा जप करण्यापेक्षा देवाचे नाव घेतले असते तर पुण्य लागले असते असे अमित शाह म्हणाले. त्याचा निषेध नोंदवला जातो आहे. याचेच पडसाद हिवाळी अधिवेशनातही पाहण्यास मिळाले.

विधानसभेच्या पाय-यांवर बसून विरोधकांनी आंदोलन केले. तसंच यावेळी घटनेकरता सामील व्हा अशा घोषणाही देण्यात आल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) अशा तिन्ही पक्षांचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. निळ्या टोप्या, निळी उपरणी आणि हातात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

भाजपचे चरित्र देशासमोर : नाना पटोले
बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान भाजपाने केला आहे त्यामुळे भाजपाचे चरित्र देशासमोर आले आहे. भाजपाला संविधान संपवायचे आहे, अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन हेच सिद्ध होते आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

संपूर्ण देशाचा अपमान : आदित्य ठाकरे
देशाची जनता रस्त्यावर उतरली आहे कारण अपमान हा फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा नाही तर संपूर्ण देशाचा झाला आहे. माझा सवाल आहे की रामदास आठवले हे भाजपासह राहणार आहेत का? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे भाजपासह राहणार आहेत का ते त्यांनी सांगावे. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनेक आमदार भाजपात किंवा त्यांच्या बरोबर आहेत ते राजीनामा देणार आहेत का? माझा त्या सगळ्यांना हा सवाल आहे कारण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात आला आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR