सोलापूर : महाराष्ट्रासह विविध राज्यांतून प्रतिदिनी २५ ते ३० हजार वारकरी, तसेच अन्य भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठुमाऊलींच्या दर्शनाठी येतात. वारीच्या कालावधीत ही संख्या काही लाखोंच्या घरात असते. यातील बहुतांश भाविक हे एस्.टी. बस आणि रेल्वे द्वारे येतात. पंढरपुरात शहरी बस वाहतूक नसल्यामुळे बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरून श्रीविठ्ठलाच्या दर्शनाला येण्या-जाण्यासाठी रिक्शा हाच एकमात्र पर्याय भाविकांपुढे आहे. यासाठी रिक्शा मीटरनुसार बसस्थानकावरून ३० रुपये, तर रेल्वे स्थानकावरून ५० रुपये भाडे आकारणे आवश्यक असतांना अनुक्रमे १५० ते २०० रुपये भाडे आकारून वारकर्यांची लुटमार केली जात आहे.
सर्वसामान्य वारकर्यांची उघडपणे होत असलेली ही आर्थिक लुट रोखण्यासाठी राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून पंढरपूरसह अन्य तीर्थक्षेत्री होणार्या भाविकांची आर्थिक लुटमारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना काढावी, अशी मागणी सोलापूर हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियाना चे सोलापूर जिल्हा समन्वयक दतात्रेय पिसे यांनी सोलापूर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्याकडे केली. या वेळी सर्वश्री राजेंद्र पलनाटी व किशोर पुकाळे उपस्थित होते.
पंढरपूर बसस्थानक ते श्रीविठ्ठल मंदिरापर्यंतचे अंतर दीड किलोमीटर, तर पंढरपूर रेल्वे स्थानक ते श्रीविठ्ठल मंदिरापर्यंतचे अंतर दोन किलोमीटर आहे. येथे रिक्शा चालक मीटरनुसार भाडे आकारत नाहीत. अनेकदा रिक्शा चालक व्यक्ती नवीन असल्याचे पाहून १५० ते २०० रुपयांपर्यंत भाडे उकळतात. अन्य पर्याय नसल्यामुळे भाविकांना अधिकचे भाडे दिल्यावाचून पर्याय नसतो. रिक्शा चालकांनी योग्य भाडे घेतले, सर्वांचा लाभ होईल, असेही पिसे यांनी सांगितले.
या विषयीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, परिवहन विभागाचे सचिव, परिवहन आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, यांनाही देण्यात आले आहे. यात सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या मार्गावर येण्या-जाण्यासाठीचे रिक्शाभाडे निश्चित करून त्याचे दरफलक रिक्शा स्टॅन्ड आणि मंदिर येथे लावणे, ठरवलेल्या दराहून अधिक भाडे आकारणार्या रिक्शाचालकाच्या विरोधात तक्रार करता यावी यासाठी फलकांवर हेल्पलाईन क्रमांक देणे, परिवहन अधिकार्यांनी अचानक भेट देऊन अधिक दर आकारणार्यांवर दंडात्मक कार्यवाही करणे, भाविकांसाठी विनामूल्य अथवा अल्पदरात वाहन व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच हा विषय केवळ पंढरपूर तीर्थक्षेत्रापुरताच मर्यादित नसून राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्री असे घडते का, याचा सखोल तपास करून त्यावर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.