नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्यात आभार सभा आयोजित केल्या आहेत. त्यांची आगामी आभार सभा नाशिक मध्ये १४ तारखेला होणार आहे. मात्र, या सभेच्या निमित्ताने नाशिक मधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १४ तारखेला नाशिक मध्ये आभार सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे शिवसैनिकांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी माजी नगरसेवकांना सज्जड दम दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिकांना जमा करा, अशा सूचना देखील कांदे यांनी दिल्या आहेत. सुहास कांदे यांच्या समोरच अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने ते चांगलेच भडकल्याचे दिसून आले.
नाशिक शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यांच्यातील हा सुप्त संघर्ष वारंवार समोर देखील येत आहे. मात्र, आता १४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा होणार आहे. या सभेच्या आधीच त्यांच्यामधील हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आमदार सुहास कांदे यांनी माजी नगरसेवकांना जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्यासाठी सज्जड दम भरला. अनेक अडचणी असल्या तरी पक्षासाठी सर्वांना एकत्र यावे लागते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या सभेसाठी काम करण्याचे आवाहन यावेळी कांदे यांनी केले. नियोजन बैठकीमध्ये काही कार्यकर्ते गटबाजीवर बोलत असताना सुहास कांदे यांनी पदाधिका-यांना थांबवून चांगलेच खडे बोल सुनावल्याचे दिसून आले. मात्र आता शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.