मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राज्यातील महामंडळांचे वाटप होणार असून महामंडळाच्या वाटपांची जबाबदारी तिन्ही पक्षातील तीन प्रमुख नेत्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे, शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच महामंडळाचे वाटप होणार आहे. त्यामुळे यातूनही ब-याच नेत्यांना संधी मिळणार आहे.
महायुतीतील घटक पक्ष असणा-या भाजपचे नांदेड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. आज लोहा-कंधारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. आगामी निवडणुकात महायुती म्हणूनच की स्वतंत्रपणे लढायचे याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एकमेकांचे कार्यकर्ते खेचण्यामुळे महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता महामंडळाच्या वाटपाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महायुतीत ३ नेत्यांकडे महामंडळाचे अधिकार
राज्यात लवकरच महामंडळ वाटप करणार आहोत. महायुतीत आम्ही उदय सामंत, सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कुणाला कोणते महामंडळ मिळावे, यासाठी चर्चा करण्याचे अधिकार दिले आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.