दमास्कस : सीरियातील सत्तापालटानंतर पदच्युत राष्ट्रपती बशर अल-असद आपल्या कुटुंबासह रशियात पळून गेले आहेत. यातच आता त्यांच्यासाठी आणखी एक वाईट आणि धक्कादायक बातमी आहे. तुर्की आणि अरब मीडियाने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, पदच्युत राष्ट्रपती बशर अल-असद यांची ब्रिटिश पत्नी अस्मा अल-असद यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना रशियात राहायचे नाही. त्या घटस्फोटानंतर लंडनला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
जेरुसलेम पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अस्मा यांनी रशियन कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याच वेळी त्यांनी मॉस्को सोडण्यासंदर्भातही विशेष परवानगी मागितली आहे. त्यांच्या अर्जाचे रशियातील संबंधित अधिका-यांकडून मूल्यांक केले जात आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, अस्मा यांच्याकडे ब्रिटिश आणि सीरियन नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म आणि पालन-पोषण लंडनमध्येच सीरियन पालकांनी केले. अस्मा २००० मध्ये सीरियाला गेल्या आणि तेथेच वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी असद यांच्यासोबत लग्न केले होते.
रशियाने फ्रिज केली असद यांची संपत्ती
सध्या असद रशियामध्ये आहेत. मात्र त्यांच्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांना मॉस्को सोडण्याची अथवा कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेण्याची परवानगी नाही. रशियन अधिका-यांनी त्यांची संपत्ती आणि पैसेही जप्त केली आहेत. त्यांच्या संपत्तीत २७० किग्रा सोने, २ अब्ज डॉलर आणि मॉस्कोमध्ये १८ अपार्टमेंट्सचा समावेश आहे.