नागपूर : राजकारणी जसे बोलतात तसे वागत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असे अनेकांना वाटते. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे असे मत व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे कान टोचले आहेत. ते नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव पंथीय संमेलनात बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारात बोललो, जातपात पाळत नाही, मला वोट द्या, किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात, असेही बोललो होतो. चक्रधर स्वामी यांनी ही हाच संदेश दिला होता. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हे सर्व भेद संपले पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. राजकारण्यांनी चांगले काम करावे, जनतेचा आशीर्वाद पाठीशी कायम राहतो.
काम असे करावे की काम केल्यानंतर कोणालाच कळले नाही पाहिजे, मात्र, आजकाल १० रुपये देऊन चौकात १० फोटो लावणारे नेते ही आहेत. असे सांगून गडकरींनी राजकारण्यांना चांगलाच टोला हाणला आहे. तर याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा भाजप आमदार परिणय फुके यांनी जाहीर रित्या बोलून दाखवली आहे. नागपुरातील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात आमदार परिणय फुके यांनी काल( शनिवारी) हे वक्तव्य केले आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यावेळी मंचावर उपस्थित असताना फुके यांनी हे वक्तव्य केले आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, तरी ते ही एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार. फडणवीस यांचे महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहे. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणूकीत आशीर्वाद दिला तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असेही परिणय फुके म्हणाले.