मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग दोन द्विशतके ठोकून क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. यशस्वी याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी इंग्लंडचा जेम्स अँडरसन याची गोलंदाजी चांगलीच धुतली होती. यशस्वी याने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वाल याने मुंबईत घर घेतले आहे. या घराची किंमत सुमारे ५.५ कोटी रुपये आहे.
यशस्वी जयस्वाल याने मुंबईत राहण्यासाठी वांद्रे भागाची निवड केली. एक्स बीकेसीमध्ये ५.५ कोटी रुपयांना एक फ्लॅट त्याने विकत घेतला आहे. लियासेस फोरास या संस्थेने यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार वांद्रे (पूर्व) इमारतीच्या विंग ३ मधील १,१०० स्क्वेअर फूट फ्लॅटची नोंदणी ७ जानेवारी रोजी झाली होती. या फ्लॅटचा दर ४८,४९९ रुपये प्रति चौरस फूट आहे. यशस्वी अनेक दिवसांपासून हा फ्लॅट खरेदी करणार अशी चर्चा होती. त्याच्या कसोटी पदार्पणाच्या वेळी त्याने हा फ्लॅट घेतला आहे.
यशस्वी याचे कुटुंब उत्तर प्रदेशातून मुंबईत आले होते. त्यांचा एक काळ असा होता की ते मुंबईतील आझाद मैदानातील तंबूत राहात होते. यशस्वी क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरी मुंबईत आला. त्याला प्रशिक्षक मिळाला. त्यानंतर यशस्वी याने मागे वळून पाहिले नाही. भारतीय संघात त्याने मजल मारली. तो उत्तर प्रदेशातील बडोही जिल्ह्यातील रहिवासी आहे.
रविवारी केले दुहेरी शतक
इंग्लंडविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात यशस्वी याने दुहेरी शतक केले. एका डावात १२ षटकार मारणारा तो पहिला भारतीय तर जगातील दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी यशस्वी याने २०२० मध्ये अंडर १९ स्पर्धेत आपला दबदबा राखला होता. तो राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याला २.४ कोटी रुपयांत राजस्थान रॉयल्सने घेतले आहे.