16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeसोलापूरपुजारी असल्याचे सांगून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पैसे घेणा-यावर गुन्हा

पुजारी असल्याचे सांगून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पैसे घेणा-यावर गुन्हा

पंढरपूर : मी मंदिरात पुजारी आहे. तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवून आणतो, असे सांगून पैसे द्यावे लागतील, असे सांगून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून ११ हजार रुपये घेणा-या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

कुणाल दीपक घरत (रा. बिलाल पाडा, नाला सोपार पूर्व, ता. वसई, जि. पालघर) हे भाविक आपल्या कुंटुंबासह सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लवकर दर्शन घेणे कामी मंदिर परिसरात विचारपूस करीत होते. या दरम्यान मंदिराजवळ उभा राहिलेल्या लोकांनी देवाचे दर्शन होण्याकरिता किमान ७ ते ८ तास लागतील असे सांगितले. दर्शनाकरिता पास मिळतो अगर कसे याबाबत चौकशी करीत असताना, चिंतामणी ऊर्फ मुकुंद मोहन उत्पात, पंढरपूर या इसमाने मी मंदिरात पुजारी आहे. तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवून आणतो, असे सांगून पैसे द्यावे लागतील, ५००१ रुपयांची मंदिर समितीची पावती देतो व ६००० रुपये मला वर द्यावे लागतात असे सांगून रोख रक्कम ११ हजार रुपये स्वीकारले.

त्यानंतर तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जाऊन ५००१ रुपयेची भाविकाच्या नावे देणगी पावती करून, संबंधित भाविकाला दिली. त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करीत असताना तेथील पोलिस अधिकारी सपोनि. नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित उत्पात नावाच्या इसमावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात कलम ३१८ (३) (४) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की, श्रींचे दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दर्शन हे संपूर्णत: नि:शुल्क आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी कोणासही श्री चे पदस्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR