पुणे : प्रतिनिधी
आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि त्यातच रविवारचा योग साधून आल्याने खवय्ये भल्या पहाटेच सक्रिय झाले. उद्यापासून श्रावण सुरू होत आहे. आषाढाचा अखेरचा रविवार साजरा करण्यासाठी सकाळीच चिकन-मटणाच्या दुकानासमोर पुणेकरांनी रांगा लावल्या. हे चित्र राज्यातील इतर शहरांतही दिसून आले.
उद्यापासून मांसाहार वर्ज्य असल्याने आजच ताव मारण्याची योजना अनेकांनी केली आहे. श्रावण आणि त्यानंतर अनेक सणांची मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खवय्यांसाठी खास असणार आहे.
अनेकांनी आज जोरदार ‘गटारी’ साजरी करण्याचे नियोजन केले आहे. त्याच निमित्ताने पुण्यात देखील चिकन, मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. गटारी अमावास्या झाल्यानंतर सुरू होणा-या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्याचमुळे आज पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. चिकन -मटणाच्या दरात काहीशी वाढ जरी झाली असली तरी सकाळी सहा वाजल्यापासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर पुण्यातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.
फूड डिलिव्हरी अॅपचा सुळसुळाट
आता ऑनलाईन पण फ्रेश चिकन, मटण, मासळी देण्याचा दावा करणा-या अनेक फुड डिलिव्हरी अॅपचा सुळसुळाट झाला आहे. अनेक मोठ्या कंपन्या ग्राहकांना थेट घरपोच मांसाहाराची डिश पोहोचवत आहेत. त्यांना चिकन, मासळी पण घरपोच देत असल्याने अनेक ग्राहक या अॅपवर ऑर्डर देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून फूड डिलिव्हरी कंपन्यांची यामुळे उलाढाल वाढली आहे.