मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री नवाब मलिक, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडी व महायुतीतील सर्वच पक्षांत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली असून पुढील दोन, तीन दिवस बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. या बरोबरच आघाडीतील घटक पक्षांनी ५ ठिकाणी परस्परांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत तर महायुतीत तीन, चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. २८८ मतदारसंघांत एकूण किती अर्ज दखल झाले आहेत, याची माहिती रात्री उशिरापर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात उपलब्ध झालेली नव्हती. उद्या ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होईल व ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. शेवटच्या दिवशी काही दिग्गज नेत्यांसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या वेळी पक्षाने उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी कामठी मतदारसंघात अर्ज दाखल केला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला तर वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज भरला. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून, भाजपाच्या हेमंत रासने यांनी पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
धुळे शहर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांनी तसेच एमआयएमचे फारुख शाह यांनी, काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी नागपूर पश्चिमधून, श्वेता महाले यांनी चिखलीतून, शिवसेनेचे दीपक केसरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. बेलापूरमधून भाजपाच्या मंदा म्हात्रे, दिंडोशीतून संजय निरुपम, रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ माने, तासगाव-कवठे महांकाळमधून संजय पाटील, महाडमधून भरत गोगावले आणि नागपूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अनेक ठिकाणी बंडाचे झेंडे !
या वेळी सर्वच राजकीय पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे मिळून किमान शंभरहून अधिक मातब्बर नेत्यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे पुढील दोन दिवस त्यांची समजूत काढण्यासाठी नेत्यांना ब-याच जोर बैठका काढाव्या लागणार आहेत.
मुंबईतील माहिम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे प्रथमच निवडणूक लढवत आहेत. भाजप व शिंदे सेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे; पण शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी एक अर्ज पक्षाच्या ए, बी फॉर्मसह भरलाय तर एक अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे. कोणाचा कितीही दबाव आला तरी आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाचे मुंबईतील नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनीही बंडखोरी केली आहे. भाजपाने बाहेरच्या संजय उपाध्ये यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपाच्या प्रवक्त्या शायना एससी यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार अर्ज दाखल केला. यामुळे माजी आमदार अतुल शाह नाराज झाले होते; पण नेत्यांनी समजूत काढल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय बदलला.
माजी नगरसेवक राजू पेडणेकर हे वर्सोवा येथून निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांच्या ऐवजी हरूण खान यांना उमेदवारी देताच पेडणेकर यांनीही पक्षविरोधी भूमिका घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र शिंदे गटाने अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. दुसरीकडे भायखळा येथून काँग्रेस नेते मधू चव्हाण यांनीही बंडखोरी केली आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने चव्हाण अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत.
भाजपाने विरोध केलेला असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही एक अर्ज पक्षाच्या नावावर व एक अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. याशिवाय नांदगावमध्ये राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी शिंदे सेनेच्या सुहास कांदे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मंगेश आमले यांनी बंडखोरी केली आहे.
सख्खे भाऊ आमने-सामने
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांच्या दोन्ही मुलांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विद्यमान आमदार इंद्रनिल नाईक यांनी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
युती, आघाडीतील जागांचा घोळ कायम, मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ संपलेला नाही मात्र कोणी किती जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केलेत ते आज स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील काँग्रेसने १०२ मतदारसंघांत, शिवसेनचे ९६ मतदारसंघात तर राष्ट्रवादीने ८७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीने एकूण २८५ उमेदवार दिले आहेत तर ६ जागांवर महाविकास आघाडीतील २ पक्षांचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मिरज मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने तानाजी सातपुते यांना तर काँग्रेसने मोहन वनखंडे यांना उमेदवारी दिली आहे.
सांगोला मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंखे आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख रिंगणात आहेत. दक्षिण सोलापूर काँग्रेसकदून दिलीप माने व शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली; पण मानेंचा बी फॉर्म वेळ संपेपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. पंढरपूरमध्येही हीच स्थिती आहे. काँग्रेसचे भागीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल सावंत मैदानात उतरले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे रणजित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे आमने-सामने आहेत.
यवतमाळच्या दिग्रसमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पवन जैस्वाल आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे मैदानात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत असून त्या पूर्वी मार्ग निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे. महायुतीतही तीन ते चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.