मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेत एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय फिलीस्तीन’ची घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर देशभरात गोधळ निर्माण झाला आहे. एनडीएच्या अनेक नेत्यांनी यावर आक्षेप व्यक्त केला आहे. दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांच्या या घोषणेवर वादग्रस्त विधान केले आहे. ओवेसींची जीभ कोणी कापली तर मी त्याला बक्षीस देईन, असे वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यात ओवेसींनी ‘जय फिलीस्तीन’ म्हटल्यावर नितीश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी १८ व्या लोकसभेत शपथविधीच्या शेवटी ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा देत वाद निर्माण केला. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून पुन्हा निवडून आलेले ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली आणि ‘जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन’ अशा घोषणा देऊन त्याची सांगता झाली.
लोकसभेत ‘जय फिलीस्तीन’चा नारा लागताच शोभा करंदलाजे यांच्यासह एनडीएच्या अनेक खासदारांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या युद्धाचा सामना करणा-या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पश्चिम आशियातील प्रदेशाच्या बाजूने ओवेसी यांनी घोषणाबाजी केली. बाकावर बसलेल्या राधामोहन सिंग यांनी शपथेशिवाय काहीही रेकॉर्डवर जाणार नाही, असे आश्वासन सदस्यांना दिले.
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना ओवेसी आपल्या विधानावर ठाम दिसले. मी सभागृहात ‘जय पॅलेस्टाईन’ का बोललो, असा सवाल त्यांनी केला. इतर सदस्यही वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत मी म्हणालो ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन’. हे कसे चुकीचे आहे? राज्यघटनेतील तरतुदी सांगा? तुम्हीही इतरांचे ऐकावे. महात्मा गांधी पॅलेस्टाईनबद्दल काय म्हणाले ते वाचा, असा सल्ला त्यांनी दिला.