27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील धरणसाठा ८८ टक्के

राज्यातील धरणसाठा ८८ टक्के

पुणे : प्रतिनिधी
पावसाळ्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसल्यामुळे राज्याच्या विविध भागांत असलेली धरणे तुडुंब भरली आहेत. दरम्यान, राज्यातून मान्सून माघारी फिरला असला, तरी अवकाळी पावसाची अजूनही जोरदार हजेरी लागत आहे. त्यामुळे धरणांमध्ये अतिरिक्त झालेला पाणीसाठ्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या परतीचा पाऊस सुरू असून राज्यातील २ हजार ९९७ धरणांमध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत ८८.१७ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. मागील वर्षी याच दिवसांत ७३.९२ टक्के पाणीसाठा होता.
राज्यात जलसंपदा विभागाचे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत मोठी, मध्यम आणि लहान अशी मिळून २ हजार ९९७ धरणे आहेत. यावर्षी कोकणपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागांत जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली.

ऑगस्ट महिन्यात सलग पाऊस पडल्यामुळे कायमच पर्जन्यछायेखाली असलेल्या मराठवाडा भागातील सर्वच जिल्ह्यांत एवढा पाऊस पडला की या भागात असलेली सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत.

राज्यातील सहा विभागांपैकी सर्वांत जास्त पाऊस कोकण भागात पडला आहे. त्यामुळे कोकणातील ५३७ धरणांमध्ये सध्या ९४.१३ टक्के एवढा पाणीसाठा आहे. ऑक्टोबर महिन्यात याच दिवसांत मागील वर्षी ९३.२० टक्के एवढा पाणीसाठा होता.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात इतर विभागांच्या तुलनेत सर्वांत जास्त धरणे असून, त्याची संख्या ९२० एवढी आहे. या विभागात सध्या ७८.५७ टक्के एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी ३९.१६ टक्के एवढा पाणीसाठा होता. म्हणजेच, मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे. या विभागात बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, परभणी हे जिल्हे समाविष्ट आहेत.

नाशिक विभागात सर्व प्रकारची मिळून ५२४ धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये सध्या ८६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी ७६.०९ टक्के एवढा पाणीसाठा होता. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे चार टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे.
पुणे विभागात ७२० लहान-मोठी धरणे आहेत. या विभागात सध्या ९१.८६ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी ७९.४२ टक्के एवढा पाणीसाठा होता. मागील वर्षापेक्षा १३ टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे.

अतिरिक्त पाण्याचा विसर्ग
पुणे विभागातील पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत घाटमाथ्याच्या जास्त भागाचा समावेश होत आहे. परिणामी, या विभागात पावसाळ्याच्या दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी या प्रकारात पाऊस पडत असतो. त्यामुळे या भागात असलेल्या धरणांमध्ये कायमच पाणीसाठा जास्त होत असतो. परिणामी, धरणामधील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR