27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात ११ लाख हेक्टरवरील पिकांची हानी

मराठवाड्यात ११ लाख हेक्टरवरील पिकांची हानी

१० जणांचा मृत्यू, ५२३ जनावरे दगावली, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या ३ दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे वित्त आणि जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत पावसामुळे ११ लाख ६७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावरीली पिकांचे नुकसान झाले. १० जणांचा मृत्यू झाला, तर ५२३ जनावरे दगावली. तसेच १२२२ घरांची पडझड झाली. या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या शेतीला मोठा फटका बसला.

यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, ४८ हजार ६७७ शेतकरी बाधित झाले आहे. या शेतक-यांची ३ लाख ३४ हजार ९८५ हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २ लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. नांदेड जिल्ह्यातील ९३ मंडळापैकी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात २५ जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसांत ३ जण वाहून गेल्याची माहिती आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्र ३ लाख ४९ हजार ८५९ हेक्टरपैकी अंदाजे २ लाख ५८ हजार ८९८ हेक्टर शेती पिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे करुन २ दिवसांत माहिती प्राप्त होईल. जिरायत बाधित क्षेत्रासाठी मदत रक्कम प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये असून तीन हेक्टरच्या मर्यादेत देय आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर तर फळपिके पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देय असल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे तसेच पशुधनांचे नुकसान झालेले आहे. पावसामुळे शेतीपिकांचे तसेच पशुधनाचे पंचनामे सुरु करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस देण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा व्यवस्थापन कक्ष सुसज्ज ठेवण्यात आलेले आहे. काही अडचण आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन हिंगोली जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हिंगोलीत सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी
हिंगोली जिल्ह्यात ३ दिवसांपासून संततधार सुरू असून रविवारी एकाच दिवशी १४१.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. जिल्ह्यात १० वर्षीय मुलीसह दोघांचा मृत्यू झाला असून, १०१ जनावरे दगावली आहेत. मृतांमध्ये वसमत तालुक्यातील टेंभूर्णी येथील ३८ वर्षीय सुभाष बाबूराव सवंडकर या व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

तातडीने पंचनामे करा : महाजन
नांदेड जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली असून यामुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबताच प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR