मुंबई : भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच भाजपाने रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मोहरा गळाला लावला होता. आता दुस-याच वर्षी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाने राज्यसभेसाठी ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, रामेश्वर तेली. बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिसा येथून ममता मेहंता, राजस्थान मधून सरदार रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरा येथून राजीब भट्टाचार्जी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर या दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
भाजपाचे नेते पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजपा आपले उमेदवार देणार की त्यापैकी एक जागा मित्रपक्षाला देणार, याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता भाजपाने यादी जाहीर करत एकाच जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी भाजपाकडून अनेकांची नावांची चर्चा होती. पण, रायगडच्या धैर्यशील पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.