अयोध्या : वृत्तसंस्था
राम मंदिराचे लोकार्पण झाल्यापासून दररोज सुमारे एक लाखांहून अधिक भाविक श्री रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता लाखो भाविक, पर्यटक दररोज अयोध्येत दाखल होत आहेत. श्री रामदर्शनाची ओढ भाविकांना लागलेली आहे. केवळ देशातून नाही, तर परदेशातूनही भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. मात्र राम मंदिरात आता रामलल्ला दरबाराचे बांधकाम सुरू आहे.
राम मंदिरात वरील मजल्यावर रामलल्लाचा दरबार असणार आहे. या राम दरबारात प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींची स्थापना केली जाणार आहे. मात्र सर्वसामान्यांना राम दरबारात जाता येणार नाही, असे राम मंदिराचे प्रशासक गोपाल राव यांनी यासंदर्भात सांगितले आहे.
रामलल्ला दरबाराची जागा तुलनेने छोटी असल्याने राम मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी राम दरबाराची स्थापना केली जाईल, त्या ठिकाणी सर्वसामान्यांना जाता येणार नाही. काही मोजकेच भक्त राम दरबाराला भेट देऊ शकतील. कारण दर्शनासाठी एक लाख भाविक एकत्र आले तर ते शक्य नाही. मंदिराच्या दुस-या मजल्यावर जागेअभावी असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गोपाल राव यांनी दिली.