मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करून १० फेब्रुवारीपर्यंत अध्यक्ष आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका निकाली काढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून परस्पराविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू केली आहे. आज अध्यक्षांसमोर सुनावणी झाली तेव्हा अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रतिपक्षाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला. शरद पवार गटाच्या वकिलांनी याला विरोध केला; परंतु अध्यक्षांनी वेळ देण्याची विनंती मान्य करून २३ तारखेपर्यंत वेळ दिला त्या नंतर रोज सुनावणी होणार आहे.
विधासनभा अध्यक्षांनी ४ दिवसांचा वेळ फायनल सबमिशनसाठी देण्याची मागणी मान्य केली आहे. पुढील सुनावणी ही २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. २३ व २४ जानेवारीला शरद पवार गटाच्या ४ जणांची उलट तपासणी होणार आहे तर २५ जानेवारीला अजित पवार गटाच्या २ साक्षीदारांची उलट तपासणी होईल. २९ जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन असणार आहे आणि ३० जानेवारीला अंतिम युक्तिवाद होणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी ३० जानेवारीला सुनावणी संपवून एका दिवसात निर्णय देणे कठीण आहे. यामुळे अध्यक्षांकडून २ आठवड्यांची मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारीपर्यंत निकाल येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
भाकरी फिरवण्याची भाषा म्हणजे मनमानी
अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवार हे मनमानी करतात, असा आरोप करण्यात आला आहे. या बाबत अजित पवार गटाचे प्रतोद व मंत्री अनिल पाटील यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा, ‘‘शरद पवार हे सतत त्यांच्या भाषणामधून भाकरी फिरवली जाईल, असे म्हणत होते. पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात असंतोष आणि नाराजी आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्या संदर्भात सातत्याने चर्चा केली जात होती. भाकरी फिरवली जाईल त्याचा अर्थ असा होता की, पक्षात कुठे तरी मनमानी सुरू असल्यामुळे असे निर्णय झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. आमच्या बाजूचे सर्व पुरावे दिले आहेत आणि ते सर्व पुरावे हे कायदा आणि घटनेला धरून आहेत.
आमच्या अधिकार क्षेत्रातील जे काही पुरावे असतील ते न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यामुळे शरद पवार गटाने काय पुरावे दिले आहेत, त्यापेक्षा आम्ही काय पुरावे सादर केलेत तेच अंतिम सत्य असणार आहे, असा दावा अनिल पाटील यांनी केला तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अनिल पाटील हे भाजपाने उमेदवारी दिली नाही म्हणून २०१९ ला राष्ट्रवादीत आले आहेत त्यांना पक्षाची फारशी माहिती नसल्याचा टोला लगावला.