नवी दिल्ली : बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना दिशाभूल करणा-या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मानहानीचा खटला बंद केला आहे.
पतंजलीच्या उत्पादनांबद्दल दिशाभूल करणा-या जाहिराती दिल्याप्रकरणी माफीनामा दाखल करण्यात आला होता, जो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीवर कोविड-१९ लसीकरणासंदर्भात मोहीम चालवल्याचा आरोप केला होता. त्यावर न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या खोट्या आणि दिशाभूल करणा-या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेत पतंजलीच्या भ्रामक जाहिरातीमुळे अॅलोपॅथी औषधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले होते.
आयएमएने म्हटले होते की पतंजलीचे दावे पडताळले गेले नाहीत आणि ते ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट १९५४ आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ सारख्या कायद्यांचे थेट उल्लंघन आहे. पतंजली आयुर्वेदाने दावा केला होता की, कोरोना आजार त्यांच्या कोरोनिल औषधाने बरा केला जाऊ शकतो. या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने कंपनीला फटकारले आणि तिचे प्रमोशन थांबवण्यास सांगितले होते.
रामदेव यांनी मागितली होती माफी
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी असूनही वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जात आहेत आणि तुमचा क्लायंट (बाबा रामदेव) जाहिरातींमध्ये दिसत आहे. यानंतर रामदेव यांच्या वकिलांनी भविष्यात असे होणार नाही असे सांगितले होते. रामदेव यांनी कोर्टाची माफीही मागितली होती. या वर्तनाची मला लाज वाटते, असे ते म्हणाले होते. तेव्हा खंडपीठाने देशातील प्रत्येक न्यायालयाचा आदर केला पाहिजे असे म्हटले होते.