श्रीनगर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय एकमताने कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ‘आयडिया ऑफ इंडियाचा पराभव’ असल्याचे म्हटले आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, हा देखील गांधींच्या भारताचा पराभव आहे, ज्याला जम्मू-काश्मीरच्या जनतेने पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून निवडले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी एक स्टेटमेंट जारी केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगू इच्छिते की हिंमत हारू नका. आम्ही आशा सोडावी असे आमच्या विरोधकांना वाटते पण तसे होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कलम ३७० हे तात्पुरते आहे, ते आमचे नाही तर भारताच्या कल्पनेचा पराभव आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, १९४७ नंतर जेंव्हा राज्यघटना तयार झाली तेव्हा जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला. पण ७० वर्षांनंतर असे सरकार आले ज्याने नेहमीच असे सांगितले की ते सत्तेवर आले तर कलम ३७० हटवू आणि त्यांनी तसे केले. हा आमचा पराभव नाही. त्यांनी फसवणूक केली. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील त्या शक्तींना बळकटी दिली ज्यांनी भारताची बाजू घेणे चुकीचे असल्याचे सांगितले.
संघर्ष सुरूच राहणार
या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण निराश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा निर्णय निराश करणारा आहे. संघर्ष सुरूच राहणार आहे.