24.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeराष्ट्रीयदिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ चा छत कोसळला; १ ठार, ६ जखमी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ चा छत कोसळला; १ ठार, ६ जखमी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी मोठा अपघात झाला. जोरदार पावसामुळे विमानतळाच्या टर्मिनल-१ चा छत कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक गाड्या गाडल्या गेल्या असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सूत्रांच्या मते, विमानतळाच्या टर्मिनल १ वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच चेक-इन काउंटर ही बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचले आहेत. या अपघाताची सखोल चौकशी केल्यानंतरच उद्यापासून टर्मिनल १ सुरू करण्यात येईल, असे नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. तर जखमींना तीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. माध्यमांशी बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणाले की, मुसळधार पावसामुळे विमानतळाबाहेरील छताचा काही भाग कोसळला आहे. या दु:खद घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो, घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद दल, अग्निसुरक्षा दल आणि सीआयएसएफ, एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणामुळे विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

काँग्रेसने भाजप सरकारवर केला हल्लाबोल

दिल्ली विमानतळावरील छत कोसळण्याच्या घटनेवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या दुर्घटनेसाठी गेल्या १० वर्षांतील मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराला जबाबदार धरले आहे.

भाजपचे भ्रष्ट मॉडेल झाले उघड -प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनीही या दुर्घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, अयोध्येतील बांधकामाच्या दुरवस्थेमुळे संपूर्ण देश दु:खी झाला असताना मार्चमध्ये पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळावरील उद्घाटन केलेल्या टर्मिनल-१ चा छत आज कोसळल्याने एका कॅब चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या जबलपूर विमानतळाचा देखील छत कोसळला आहे. देणग्या घ्या आणि उद्योग करा हे भाजपचे भ्रष्ट मॉडेल आता उघडे झाले आहे, या निकृष्ट बांधकामांची आणि या भ्रष्ट मॉडेलची जबाबदारी पंतप्रधान घेणार का, असा सवाल प्रियंका गांधींनी मोदींना केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR