नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांचे दोन मुले तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना दिल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आज या तिघांना जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आरोपीला दिलासा दिला.
तपासादरम्यान आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. लालू, तेजस्वी, तेज प्रताप यांच्यासह ८ आरोपी नोकरीसाठी जमीन प्रकरणात हजर झाले होते. त्यात अखिलेश्वर सिंह, हजारी प्रसाद राय, संजय राय, धर्मेंद्र सिंह आणि किरण देवी यांचा समावेश होता. यापूर्वी ईडीने या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्याआधारे न्यायालयाने तिघांनाही समन्स पाठवले होते. लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमिनीच्या रूपाने अवैध नफा कमावल्याचा आरोप आहे.
२००४ ते २००९ या काळात लालूंच्या रेल्वेमंत्रीपदाच्या कार्यकाळात मध्य प्रदेशातील जबलपूर येथे रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागात ग्रुप-डी नियुक्तींशी संबंधित हे प्रकरण आहे. लालू कुटूंबीयानी रेल्वेत नौकरी देण्याच्या बदल्यात लोकांकडून त्यांच्या जमीनी हाडप केल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणात तेज प्रताप यादव पहिल्यांदाच न्यायालयात हजर झाले होते.