नवी दिल्ली : काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे आणि प्रादेशिक पक्षांच्या महत्वाकांक्षेमुळे भाजपविरोधात उभी राहिलेली इंडिया आघाडी नावापुरतीच राहिली आहे. या पक्षांची दहा दिशांना दहा तोंडे अशी अवस्था झाली असून अरविंद केजरीवाल यांनी आता दिल्लीतही इंडिया आघाडीची साथ सोडल्याचे वक्तव्य केले आहे. दिल्लीकर सातही लोकसभेच्या जागा आपला देतील असे वक्तव्य केजरीवाल यांनी एका सभेत केले आहे.
दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. केजरीवालांनी शनिवारीच चंदीगड आणि पंजाबमध्ये आप एकटी लढणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु दिल्लीबाबत काही घोषणा केली नव्हती. परंतु आज त्यांनी दिल्लीकर सातही जागा आपलाच देतील, असे वक्तव्य केल्याने दिल्लीतही ते काँग्रेससोबत आघाडी करून लढणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पंजाबच्या तरनतारनमध्ये एका सभेला केजरीवाल संबोधित करत होते. आज भाजपला फक्त आम आदमी पार्टीची भीती वाटते. आम आदमी पक्षाचा देशभरात झपाट्याने विस्तार झाला आहे. आप १० वर्षांचा लहान मुलगा आहे. या लहान मुलाने एवढा मोठा पक्ष उध्वस्त केला आहे. ‘आप’ त्यांना झोपू देत नाहीय. आम्ही रात्री भुतासारखे त्यांच्या स्वप्नात येतोय. यामुळे पंजाबमध्ये आम्हाला काम करण्यापासून रोखले जात आहे आणि दुसरीकडे दिल्लीत हे लोक आम्हाला थांबवत आहेत. मला जे काम करायचे आहे ते करू दिले जात नाही असा आरोप केजरीवाल यांनी
भाजपा आणि काँग्रेसवर केला.
दहा वर्षांच्या आता छोट्याशा पक्षाने पंजाब, दिल्लीत सरकार बनविले. गुजरात, गोव्यात आमदार झालेत. जिथे निवडणूक असते तिथे खूप मते मिळत आहेत. यामुळे एक दिवस केंद्रात आप सत्ता स्थापन करेल अशी भीती भाजपाला वाटू लागली असल्याचे केजरीवाल म्हणाले.